ठाणे मतदाता जागरण अभियान म्हणजे संवाद, संघर्ष व संघटन याद्वारे आमच्या शहरावर आमचाही अधिकार सांगणारी नागरिकांची चळवळ, दक्ष नागरिकांचा विरोधी पक्ष, महापालिकेच्या अधिकारी-लोकप्रतिनिधी-ठेकेदार यांच्या भ्रष्ट कारभारावर लक्ष ठेवणारे नागरिकांचे संघटन, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, रस्ते-वाहतूक आणि निवारा व अन्य नागरी समस्यांवर रस्त्यावर उतरून हक्क व अधिकार यासाठी लढाई करणारे लोक, नागरी-संघटन


ठाण्यात सर्व संस्था-संघटनांनी एकत्र येत एक सक्षम नागरी चळवळ उभी राहावी, त्याचबरोबर शहराच्या विकासाच्या नावावर आपल्या कर-रुपी तिजोरीवर खुले आम डल्ला मारणाऱ्या लोकप्रतिनिधी-अधिकारी-कंत्राटदार यांच्या भ्रष्ट युतीला शह देण्यासाठी प्रामाणिक नागरिक, लढाऊ सामाजिक कार्यकर्ते व विविध विषय तज्ञ व अभ्यासू यांना पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयोग म्हणजे ठाणे मतदाता जागरण अभियान… गेल्या तीन वर्षात अनेक प्रमुख विषयांना प्रवाहात आणून नागरिकांचा आवाज बुलंद करून राज्यकर्ते व प्रशासन यांना दखल घ्यावी लागली, असे काम निश्चित उभे राहिले, त्याचा हा संक्षिप्त अहवाल, परीक्षणात्मक आढावा व हे काम अधिक ताकदीने पुढे नेण्यासाठी काय करावे याचे आत्मपरीक्षण

२०१७-१८-१९ या तीन वर्षातील काही प्रमुख घटनांचा आढावा

फेब्रुवारी २०१७ : ठाणे शहराच्या इतिहासात दुसऱ्यांदा.. अशोका फेलोशिप विजेते संशोधक, ७२ व्या वर्षी गावोगाव अंधश्रद्धा निर्मुलन करणारी महिला कार्यकर्ती, इंजिनिअर, गृहिणी अशा तेरा लोक-उमेदवारांनी निवडणूक लढविली, ठाणे शहरात नागरी-शक्तीचे आव्हान उभे केले. पराभव झाला पण पुढील पाच वर्षे सतत संघर्ष करण्याचा निर्धार आणि पालिका भ्रष्टाचार, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, निवारा पर्यावरण, आरोग्य, या विषयावर काम करणाऱ्या नागरी चळवळीची सुरुवात झाली

पर्यावरण नागरी चळवळीचा आस्थेचा विषय : येऊर पर्यावरण सोसायटी (YES) सोबत ग्रीन गटारी (डिसें-१७,१८) म्युज-ठाणेकर्स सोबत जागतिक पर्यावरण-दिनी मासुंदा तलावाला मानवी साखळी, तोडल्या गेलेल्या झाडांची वेदना जनमानसाला व्हावी म्हणून बॅंडेज, डॉ महेश बेडेकर यांच्या ध्वनी-प्रदूषणाच्या याचिकेसाठी डेटा जमा करण्यासाठी मदत (सप्टें-१८,१९) न्यायालयाची मनाई असताना MMRDAच्या कंत्राटदारांनी तीन-हाथ नाका येथील झाडे तोडली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले (नोव्हें-१९) विकास कि पर्यावरण नुकसान विषयावर वुई नीड यु, लोकराज, म्युज सोबत अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान (नोव्हें-१९)

पालिकेचे वृक्षांबद्दल धोरण स्वार्थी आहे, विकासाच्या नावावर बिल्डरांच्या साथीने खोऱ्याने पैसा ओढत चाललेल्या बेछूट वृक्ष-तोडीवर अनेक पर्यावरण-प्रेमी गप्प बसले असताना अभियान आवाज उठवीत आहे. झाडांची निगा राखण्याची जबाबदारी पालिकेची आहे, झाड पडून किशोर पवारांच्या मृत्युला वृक्ष-अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा यासाठी पोलिस-स्टेशनची लढाई अयशस्वी ठरली तरी मृत पवारांच्या पत्नीला पालिकेत नोकरी देण्याचा निर्णय अभियानाच्या आंदोलनामुळे पालिकेला घ्यावा लागला (फेब्रु-१८), ठा.म.जा.अभियानाच्या मोर्च्याला पाठपुराव्याला आलेले हे यश नागरिकांचेच आहे.

बेकायदेशीरपणे गठीत वृक्ष-प्राधिकरणाला विरोध करताना पालिकेने दाद दिली नाही म्हणून रोहित जोशी यांच्या जनहीत-याचीकेला संपूर्ण साहाय्य, न्यायालयाची लढाई यशस्वी कारण वृक्ष-प्राधिकरण बरखास्त करावे लागले (फेब्रु-१८) त्यामुळे ५२३६ झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला किमान ३००० झाडे वाचली, केदार पाटील यांचे निलंबन झाले. ३०० वर्षाचा हेरीटेज वटवृक्ष वाचविण्यासाठी वृक्ष-प्रेमींना साथ दिली (कोलशेत जून-१९). मेट्रो-बाधित २००० झाडे वाचविण्यासाठी जाग, म्युज व धर्मराज्य पक्ष यांच्यासह चिपको आंदोलन व रक्षाबंधन (जुलै १९)

कोपरी येथे कांदळवनाची नासाडी, पर्यावरणाचा नाश… तक्रार झाली तर पुरावा नष्ट करण्यासाठी आख्खी ओपन जीम गायब.. अभियानाचा विरोध. पालिकेचा निधि कसा, कुठे खर्च करायचा यावर नागरिकांचे लक्ष, हा अभियानाचा प्रयत्न

पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या इंग्रजी मध्यम विद्यार्थ्यांकडून बेकायदा फी गोळा करण्याच्या नियमबाह्य कृत्याबद्दल मंत्रालयात तक्रार, चौकशीचे आदेश, शिक्षण-अधिकाऱ्यांनी फी न घेण्याबाबत परिपत्रक काढले पण शिक्षण हक्क कायद्याच्या अनेक तरतुदी धाब्यावर बसवून कारभार चालूच आहे. आता पालकच साथ देत हक्काची लढाई लढत आहेत. आनंद झाला जेंव्हा पालिकेच्या शाळांतील शिक्षण दर्जा सुधारण्यासाठी पालिकेने अभियानाला बोलाविले, अभियानाने तसा प्रस्ताव दिला पण चक्रे फिरली, योजना गुंडाळण्यात आली. दरम्यान सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ अनिल सदगोपाल यांचे व्याख्यान मात्र झाले पालिका शिक्षकांसाठी (जुलै-१८)

महापालिकेचा कारभार हा अभियानाच्या चिंतेचा विषय आहे. चर्चा न होता एका तासात तीनशे-चारशे ठराव सहज मंजूर होतात, आयुक्त हुकुमशहा आहेत, असा आरोप महापौर करतात व आयुक्त-प्रशासनाच्या अरेरावीला विरोध करतात. लोकप्रतिनिधींना काहीच चिंता वाटत नाही. नागरिकांच्या पत्राला उत्तर दिले जात नाही, आर टी आय अर्जाकडे दुर्लक्ष केले जाते, तुम्ही धरणे-मोर्चा-आंदोलन करा नाहीतर कोर्टात जा, आम्हाला काही फरक पडत नाही, अशी गुर्मी अधिकारी दाखवतात, कोर्टाचे निकाल विरोधात आले तर न्यायालयाचा अपमान करून ठोकरले जातात. RTI कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करतात. तरी हेच आयुक्त टिकून आहेत.. यामागे मोठे राजकरण आहे. अशावेळी जिथे जिथे गैरप्रकार नजरेत येईल तेंव्हा आवाज उठविणे हे आमचे कर्तव्य आहे.

क्लस्टर-विरोध लढाई दोन वर्षे चालू आहे. सुरुवातीला क्लस्टर हटाव हि भूमिका घेत जन-जागृती करण्यात आली, क्लस्टरवर अनेक प्रश्न, आक्षेप उपस्थित केले, पालिका प्रशासन, राज्य-सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांनी जास्तीत जास्त सूचना व हरकती मांडाव्यात म्हणून सभा घेतल्या, लोकांचा पाठिंबा मिळत नव्हता कारण घर हा महत्वाचा मुद्दा आहे, क्लस्टर हि ठाणे शहरासाठी आवश्यक योजना आहे, हे जाणवल्यानंतर क्लस्टर योजनेला विरोध न करता क्लस्टर योग्य व पारदर्शक रीतीने राबविले पाहिजे अशी भूमिका घेऊन लोकांच्या बैठका घेत जनजागरण सुरु केले. स्वयं-पुनर्विकासाच्या मार्गानेच क्लस्टर व्हावे, त्यासाठी आवश्यक त्या सर्व नियम, कायदे व सरकारी निर्देश यासाठी सातत्याने आग्रहाची भूमिका घेतली. जेंव्हा जेंव्हा प्रशासन, मंत्री चुकीचे पाऊल उचलतात, तेंव्हा तेंव्हा त्याला विरोध केला आहे.

ऑगस्ट १९ मध्ये स्वयं-पुनर्विकासाचा आग्रह धरणारी क्लस्टर हक्क परिषद व डॉ चंद्रशेखर प्रभू यांचे मार्गदर्शन यामुळे ठाण्यातील क्लस्टर आंदोलनाला ठाम दिशा मिळाली आहे. क्लस्टर चुकीच्या पद्धतीने राबविल्यास फक्त राजकारण्यांचा व बिल्डरांचा फायदा होणार हे वारंवार सांगितले आहे (जुन-१९) वस्तुनिष्ठ माहिती देणारे क्लस्टर-संकेतस्थळ बनवून उद्घाटन केले (सप्टे-१९) निवडणुक तोंडावर येताच क्लस्टरला शासनाची मंजुरी मिळाल्याचे खोटे निवेदन पालकमंत्री, आयुक्त यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत (सप्टें-१९) केले, अभियानाने लागलीच पत्रकार परिषद घेत खोटेपणाचा समाचार घेतला, याची शिक्षा म्हणून, अभियान व अन्य संघटनांना गडकरी कट्टा येथे पत्रकार परिषद घेण्यास मनाई-हुकुम दिला गेला. चंद्रशेखर प्रभू सोबत क्लस्टर बाधितांसाठी “क्लस्टरमध्ये स्वयंपुनर्विकास का व कसा?” मार्गदर्शन कार्यशाळा (ऑक्टो-१९)

शहराचा विकास व्हावा, रस्ते मोठे व्हावेत म्हणून गरिबांची घरे व दुकाने सर्रास तोडली जातात, या गंभीर निवारा प्रश्नावर, रेंटल घरांचा प्रश्न, न्याय्य पुनर्वसन यावर सातत्याने संघर्ष, धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांना घराच्या क्षेत्रफळाचे हमीपत्र मिळावे या व अन्य मागण्यांसाठी महापालिकेवर धरणे (में-१९), क्लस्टर जागृतीसाठी भर पावसात जबाब दो आंदोलन (जुलै-१९). ठाणे स्टेशनजवळ सुभाष पथ व्यापाऱ्यांनी आपली जागा विना-मोबदला रुंदीकरणासाठी दिली त्याचा कब्जा रिक्षा चालक, फेरीवाल्यांनी घेतला, २ वर्षे न सुटलेला प्रश्न अभियानाने सोडविला जनतेच्या जागेवरील हक्क (Right to Public Place) परत मिळविला (डिसें-१८)


  • अनवाणी चालत आलेल्या शेतकऱ्यांचे स्वागत, जेवण-पाण्याची सोय (मार्च-१८)
  • रस्त्यावरील खड्ड्यात वाहन घसरून मृत्यू झाल्या प्रकरणी पालिकेला जागे करण्यासाठी कासारवडवली खड्ड्यातच निदर्शने आयोजित (ऑग-१९)
  • ठाण्यात नगर-खात्यात बिल्डर भरपूर पैसा देतात किंवा पैसे झाडावर लागतात किंवा रस्त्यावर उगवतात तसेच शिक्षण-खात्यात खाता येतात. विद्यार्थ्यांसाठी एकेक भारी योजना आणायची, १४० लाखाच्या लुटीला, हँड-वॉश योजनेला अभियानाने विरोध केला (सप्टें-१९) गणवेश, दफ्तरे, वह्या यामार्गे लुट चालूच असते. त्यातील ४ कोटींची अफरातफर अभियानाने दाखवून दिली (में-१९)
  • ३० कोटीच्या आपला दवाखाना हि योजना विरोधामुळे बारगळली (सप्टें-१९)
  • कळवा रुग्णालयातील सिटी-स्कॅन व MRI मशीन निशुल्क करण्यासाठी व कामगार विमा इस्पितळ सुरु व्हावे यासाठी अभियानाने पाठपुरावा केला (जाने-१९)