लवादाच्या निर्णयाप्रमाणे वृक्ष धोरण बनवा – ठाणे वाचवा झाडे वाचवा माणसे वाचवा

ठाणे मतदाता जागरण अभियान – आमच्या शहरावर आमचा अधिकार

वृक्ष अधिकारी आपले कर्तव्य बजावत नसल्याने एका सामान्य माणसाचा मृत्यू झाला आहे, आणि या परिस्थितीत सुधारणा घडवून आणायची असेल तर या वृक्ष अधिकार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून आता पाच दिवस झाले पण पोलीस सत्ताधारी आणि पालिका प्रशासन यांची युती हे काम होऊ देत नाही,

शोक-संतप्त स्थानिक नागरिकांच्या आग्रहामुळे ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने झाड पडून मृत्युमुखी पडलेल्या अॅड किशोर पवार यांना भर रस्त्यावर किमान अडीचशे लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहली. या सभेत बोलताना आमच्या वतीने वंदनाताई शिंदे यांनी म्हटले – आम्ही किशोर पवार यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत, त्याच्या पदवीधर पत्नीला महापालिकेत नोकरी मिळवून देणारच.. “आमचा किशोरचा ज्या परिस्थितीत दुर्दैवी मृत्यू झाला तशी वेळ आणखी कुणावर येऊ नये”, असा हंबरडा त्याच्या आईने फोडला तेंव्हा हि आमची जबाबदारी आहे कि हि वेळ कोणावर येऊ नये आणि म्हणून झाडांची निगा राखली पाहिजे.

झाडे देखील सजीव आहेत व आपल्याप्रमाणे सृष्टीचा घटक आहेत. त्यामुळे झाडे का पडतात याच्याकडे आपण पाहू, आपल्या रस्त्यांचे अशास्त्रीय पद्धतीने डांबरीकरण/कॉन्क्रेटकरण करताना झाडांच्या बुंध्याला आपण पक्क करून झाडांच्या मुळाना पाणी, हवा, ऑक्सिजन काही मिळत नाही त्यामुळे मुळे कमकुवत होतात, पावसाळ्यापूर्वी झाडांची शास्त्रशुद्ध पद्धतीने छाटणी करायला हवी. हे करण्याचे काम वृक्ष-प्राधिकरणाचे आहे, यासाठी आपण वृक्ष-कर भरतो.

ठाण्यात हे होत नाही. उलट बिल्डरांसाठी झाडे तोडण्याचे काम शीघ्र गतीने करणारे वृक्ष अधिकारी इंदुलकरांच्या केसचा चुकीचा हवाला देऊन नागरिकांना फांद्या, धोकादायक झाडे तोडायला परवानगी देत नाहीत, यामुळे आणखी झाडे या पावसाळ्यात पडणार आहेत, हे नक्की

ठाणे मतदाता जागरण अभियानाचे पत्र

प्रति,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

नौपाडा पोलीस स्टेशन,

नौपाडा, ठाणे

विषय: अॅड. श्री. किशोर पवार यांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा – स्मरण पत्र क्र १

संदर्भ – २६ जुलै २०१७ चे पत्र आणि ACP सायगावकर साहेब यांच्या विनंतीप्रमाणे २८ जुलै रोजी दिलेले पुरावे

महोदय,

काही दिवसांपूर्वी पाचपाखडी येथील उदय नगर सोसायटी जवळील एक झाड कोसळून रस्त्यावरून जाणारे ऍड. श्री. किशोर पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वरकरणी हा अपघात वाटत असला तरी तो अपघात नसून सदोष मनुष्यवधच आहे, म्हणून ठाणे पालिकेचे वृक्ष अधिकारी श्री केदार पाटील यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केल्यानंतर आमच्या शिष्टमंडळाला आपण चौकशी करून गुन्हा दाखल करू असे खात्रीपूर्वक सांगितले आहे. ACP सायगावकर यांनीदेखील आमच्या म्हणण्याशी सहमती दर्शविली होती.

या मागणीच्या पुष्ट्यर्थ दि. १६ मार्च २०१७ रोजी मा. हरित लवादाच्या पश्चिम विभागाने प्रदीप इंदुलकर विरुद्ध ठाणे महानगर पालिका दावा क्र. १५७/२०१६ या खटल्याचा निकाल, आणि मा. हरित लवादाच्या दिल्ली येथील प्रमुख खंडपीठाने आदित्य प्रसाद विरुद्ध भारत सरकार या दावा क्र. ८२/२०१३ या दाव्यात दि. २३ एप्रिल २०१३ रोजी दिलेले आदेश आणि ACP सायगावकर साहेब यांनी विनंती केल्याप्रमाणे अन्य पुरावे आपल्याला दिलेले आहेत. आज पाच दिवस होऊनही आपल्याकडून काहीही कारवाई होताना दिसत नाही.

सरकारी अधिकारी म्हणून वृक्ष अधिकारी केदार पाटील यांनी आपल्या कामात केलेली कुचराई गंभीर आहे कारण महापालिका हद्दीत गेल्या पाच दिवसात अनेक झाडे पडली आहेत किंवा धोकादायक अवस्थेत असल्याने पडणार आहेत आणि त्यात आणखी बळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्याची तातडीची गरज आहे.

शुक्रवारी संध्याकाळी पाचपाखाडी येथे शोकसंतप्त स्थानिक नागरिकांनी सुद्धा आपल्या श्रद्धांजली सभेत हीच भावना व्यक्त केली, अनेक वृत्तपत्रात याचे रिपोर्ट आले आहेत. तेंव्हा आपणास आम्ही पुन्हा एकदा नम्र निवेदन करीत आहोत कि आपण त्वरित गुन्हा दाखल करावा किंवा गुन्हा दाखल करणार नसल्यास आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर नागरिक आपली भूमिका ठरवतील.

धन्यवाद,

आपले विश्वासू

(उन्मेष बागवे , सचिव) / ७०४५७ ९३४१६

cc – ठाणे पोलीस आयुक्त – या प्रकरणी आपण लक्ष घालावे, यासाठी आपल्या भेटीची वेळ मिळावी

cc – “आपले सरकार” या संकेत-स्थळावर महाराष्ट्र राज्य गृह-मंत्रालयाच्या माहितीसाठी

पालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा…

पोलीस आयुक्तांकडे मागणी

पालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा या मागणीच्या पाठपुराव्यासाठी मतदाता जागरण अभियानाच्या शिष्टमंडळाने ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली, झाडे पडतात आणि पडणारच व कोणते झाड कधी पडेल हे आपण सांगू शकत नाही, तेंव्हा या प्रकरणी गुन्हा घडला आहे असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही, तेंव्हा झाड पडल्याने नागरिकाचा मृत्यू झाल्यास तो सदोष मनुष्यवधाचा प्रकार होऊ शकत नाही असे मत पोलीस आयुक्तांनी व्यक्त केल्याने ठाणे मतदाता जागरण अभियानाने एकूण प्रशासनाच्या अनास्थेविषयी चिंता व्यक्त केली आहे.

वृक्ष अधिकारी आपले काम योग्य रीतीने करीत नाहीत, झाडांची निगा राखत नाही म्हणून अपघात होतात आणि लवादाने आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने एक अधिकारी म्हणून या अपघाताची जबाबदारी व त्यामुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी वृक्ष अधिकाऱ्यावर येते असे प्रतिपादन शिष्टमंडळातील संस्थेचे अध्यक्ष अनिल शाळीग्राम यांनी केले. त्यावर “लवादाच्या निर्णयात शिक्षा देण्याची तरतूद आहे का, अशी काळजी न घेतल्यास तो गुन्हा आहे असे लवादाने म्हटलेले नाही तेंव्हा तुम्ही म्हणता म्हणून मी गुन्हा दाखल करू शकत नाही” असे आयुक्त म्हणाले

अनेक दाखले दिल्यानंतर आणि पुरावे दाखविल्यानंतर त्यांनी केवळ याबाबत पोलीस खात्यातील वकील आणि कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊ आणि मग काय करायचे हे ठरवू इतकेच आश्वासन दिले. जाता जाता हे प्रकरण तुम्ही पालिका आयुक्त, मंत्रालय यांना द्या, जनहीत-याचिका दाखल करा असा सल्ला दिला…

याचा अर्थ स्पष्ट आहे की पोलिसांकडून हा गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाही ठाणे मतदाता जागरण अभियान आता या प्रकरणी नगरविकास/गृह मंत्री आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री यांच्या पातळीवर पाठपुरावा करणार आहे आणि गरज पडल्यास यावर आंदोलन उभारण्याची तयारी आहे अशी माहिती उपाध्यक्ष वंदनाताई शिंदे यांनी दिली

दरम्यानच्या काळात वृक्ष प्राधिकरणाची वृक्ष छाटणी बेछूट वाढली आहे असे आढळून आले आहे आणि किशोर पवार दुर्घटना पुन्हा झाल्यास आपण अडकु या भीतीनं वृक्ष प्राधिकरण पुन्हा चुकीच्या गोष्टी करत आहे, ज्या सोसायट्याना काही दिवसापूर्वी फांद्या तोडायला परवानगी नाकारली गेली होती अशा सोसायट्यांना स्वतः पालिकेचे कर्मचारी परवानगी देत फिरत आहेत आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा गरज नसताना भरपूर छाटणी होणार आहे. काही ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागण्याचे कष्ट न घेता नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते बिनधास्त छाटणी करीत आहेत आणि हे आपण रोखू शकत नाही अशी हतबलता नागरिक अनुभवत आहोत. ठाण्यात या निमित्ताने कायद्याचे राज्य आणि संमजसपणा दोन्ही लुप्त झाल्याचे दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *