मा नगरसेवक ठाणे महानगरपालिका, ठाणे

विषय : वृक्ष अधिकार्यादच्या हलगर्जीपणा मुळे एका नागरिकाचा अंगावर झाड पडून हकनाक मृत्यू झाल्या प्रकरणी वृक्ष अधिकार्या्वर प्रशासकीय कारवाई करणेबाबत आणि इतर.

महोदय,

ठाण्यातील पाचपाखाडी येथील उदयनगर सोसायटी समोर एक मोठे झाड अंगावर कोसळून ठाण्यातील एक तरुण वकील अॅड. श्री. किशोर पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला ठाण्यात दर वर्षी अनेक वृक्ष कोसळतात ती एक नैसर्गिक आपत्ति आहे असे भासवून प्रशासन प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. ती आपल्या समोर मांडण्यासाठी हा पत्रप्रपंच.

महाराष्ट्र झाडांचे जतन आणि संवर्धन (नागरी क्षेत्र) अधिनियम – १९७५ नुसार शहरातील सर्व झाडांचे, ती पालिकेच्या, सरकारच्या किंवा अगदी खाजगी जागेतील सुद्धा झाडांचे संवर्धन, जोपासना आणि संरक्षण करणे ही पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने वृक्ष अधिकार्याीची जबाबदारी आहे. शहरातील झाडांची योग्य निगा राखली जात नाही, त्यांची नियमित शास्त्रीय पद्धतीने छाटणी होत नाही, धोकादायक झाडांची मोजणी, सर्वेक्षण होत नाही, नको असलेली झाडे किंवा फांद्या धोकादायक ठरवून बेछूटपणे तोडली जातात आणि त्यामुळे झाडे कोसळतात हे लक्षात आल्याने ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रदीप इंदुलकर यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केलेल्या याचिकेवर निर्णय देताना याचिकाकर्त्याचा दावा मान्य करून बेछूट वृक्ष छाटणीमुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीची भरपाई म्हणून ठाणे महानगर पालिकेला पन्नास हजार रुपये दंड ठोठावला होता आणि शहरातील झाडांच्या सुयोग्य आणि शास्त्रीय छाटणीचे धोरण पुढील दोन महिन्यात तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी मा. लवादाने दीपक वाहीकर वि. पुणे महानगर पालिका या खटल्यात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचाही संदर्भ दिला होता. दि. १६ मार्च २०१७ रोजी दिलेल्या या आदेशाना आता चार महीने उलटून गेले तरीही हे धोरण तयार करण्यात आलेले नाही.

त्याच प्रमाणे मा. लवादाने लवकरात लवकर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून झाडांची गणना करावी असेही आदेश त्या निर्णयात दिले होते. उपरोक्त अधिनियमानुसार दर पाच वर्षानी झाडांचे सर्वेक्षण करणे वृक्षप्राधिकरणास बंधनकारक आहे. ठाण्यात शेवटची वृक्षगणना इ. स. २०१० -११ साली झाली होती. याचा अर्थ पुढील गणना इ. स. २०१५-१६ साली होणे गरजेचे होते परंतु ती अद्याप गणना झाली नाही, मा. हरित लवादाने आदेश देऊनही त्या दृष्टीने काहीच प्रगति झाली नाही, थोडक्यात पालिका आयुक्त आणि वृक्ष प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष श्री. संजीव जैस्वाल आणि वृक्ष अधिकारी श्री. केदार पाटील यांनी लवादाचे आदेश धाब्यावर बसवले.

दि. १६ मार्च २०१७ नंतर शहरातील नागरिकांनी आणि हाऊसिंग सोसायटयानी त्यांच्या आवारातील झाडांच्या छटणीसाठी जे अर्ज केले ते सर्व अर्ज हरित लवादाच्या संबंधित आदेशाचा दाखला देऊन श्री. पाटील यांनी फेटाळून लावले आणि नागरिकांमध्ये अशी भीती निर्माण केली की जणू काही हरित लवादाने झाडे आणि झाडांच्या फांद्या तोडण्यास मनाई केली आहे, मात्र मा. लवादाच्या आदेशात अशी कुठलीही मनाई केलेली नाही. मात्र त्याच वेळी बिल्डर आणि विकासकाना झाडे तोडण्यास, पुन:रोपण करण्यास मात्र परवानग्या दिल्या गेल्या. याचा अर्थ लवादाच्या निर्णयामुळे श्री. केदार पाटील यांचे वृक्ष अधिकारी म्हणून असलेले अधिकार संकुचित होतील या शंकेने बदल्याच्या भावनेतून श्री. केदार पाटील यांनी हरित लवादाच्या निर्णयाची दहशत निर्माण करून शहरात अनागोंदीचे वातावरण निर्माण केले. यामुळे अनेक झाडांची वेळीच छाटणी होऊ शकली नाही आणि त्यामुळे वृक्ष कोसळण्याच्या संखेत वाढ झाली.

आणखी एका प्रकरणात राष्ट्रीय हरित लवादाच्या प्रमुख खंडपीठाने आदित्य प्रसाद विरुद्ध भारत सरकार या दाव्यात झाडाभोवती असलेल्या कोंक्रेटच्या फासामुळे झाडे कोसळतात हा अर्जदाराचा दावा मान्य करून दि. २३ मार्च २०१३ रोजी दिलेल्या आदेशात झाडाभोवतीचे कोंक्रेटचे आवरण काढून झाडाच्या बुंध्यापासून एक मीटर पर्यंतची माती उघडी राहावी असे आदेश दिले होते. या आदेशाची माहिती श्री. प्रदीप इंदुलकर यांनी त्यांच्या समोरील इमारतीच्या आवारातील झाड कोसळले तेव्हा वृक्ष अधिकारी श्री. केदार पाटील यांना दिली होती.

तसेच ठाण्यातील तरुणांच्या एका संघटनेने इ. स. २०१२ साली ठाण्यातील वृक्षांच्या गळ्याभोवती टाकलेला कोंक्रेटचा फास उकरून काढण्याचे आंदोलन करताना पालिकेच्या मुख्यालयाभोवतीच्या वृक्षाच्या मुळाशी असलेले सीमेंट खणून काढले होते. याचा अर्थ पालिकेचे वृक्ष अधिकारी श्री. केदार पाटील यांना झाडांभोवती कोंक्रेट असल्याने वृक्ष कोसळतात याची पूर्ण कल्पना होती. पालिकेचे वृक्ष अधिकारी म्हणून झाडांचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी त्यांचेवर असल्याने त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे होते किंबहुना ते त्यांचे कर्तव्य होते.

उदय नगर परिसरातील जे झाड कोसळून श्री. किशोर पवार यांच्या मृत्यू झाला त्या झाडाच्या मुळाशी सुद्धा कोंक्रेटचा फास होता हे सोबत जोडलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होते. याचा अर्थ शहरातील झाडांची योग्य छटणी न झाल्याने आणि त्यांच्या बुंध्याशी असलेल्या कोंक्रेट मुळे शहरात झाडे कोसळत आहेत.

वृक्ष अधिकारी म्हणून श्री. केदार पाटील आपल्या कर्तव्यात कमी पडले, त्यांनी काहीही कारण नसताना सरसकट छाटणीच्या परवणग्या नाकारून शहरात अराजक सदृश्य परिस्थिति निर्माण केली आणि यात एका निर्दोष ठाणेकर नागरिकाचा बळी गेला. यासाठी त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्ही नागरिकांनी पोलिसांकडे मागणी केलेली आहे. या मागणीला आपण पाठिंबा द्यावा त्याच बरोबर वृक्ष अधिकारी म्हणून केदार पाटील या अत्यंत अकार्यक्षम आणि उद्दाम अधिकार्यालवर प्रशासकीय कारवाई करावी.

श्री. केदार पाटील यांचेवर कारवाई करण्यासाठी या मृत्यू खेरीज इतरही अनेक करणे आहेत ती या निमित्ताने आम्ही आपल्या समोर मांडीत आहोत.

  • या अधिकार्याखची कारकीर्द वादग्रस्त नेमणुकीपासूनच सुरू होते. दि. २८/०७/२००० रोजी उद्यान तपासणीस या पदासाठी झालेल्या नेमणुकीत एकूण चार उमेदवार निवडले गेले त्यातले तीन एम, एस्स, सी. (शेतकी) होते तर फक्त केदार पाटील हेच बी. एस्स. सी. होते आणि तेही वनशास्त्र या शाखेतील.
  • केदार पाटील यांची नेमणूक ओपन ओबीसी गटातून झालेली आहे ज्या गटात एकूण आठ उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यातले केदार पाटील वगळता सर्व एम. एस्स. सी. होते तरीही बी. एस्स. सी. तेही वनशास्त्र विभागातील पदवी असलेल्या पाटील यांची नेमणूक झाली. याचा अर्थ त्यांचे शिक्षण या उद्यान तपासणीस या पदालाही योग्य आणि पुरेसे नाही.
  • तसेच उद्यान अधिक्षक आणि उद्यान निरीक्षक अश्या दोन्ही पदांवर अधिकारी असतानाही श्री. केदार पाटील यांना दि. ०२ मे २०१५ ते २१/०८/२०१५ आणि १६/१२/२०१५ ते आज पर्यन्त वृक्ष अधिकारी हा पदभार दिला गेला, ज्यावेळी ते केवळ उद्यान तपासणीस या पदावर कार्यरत होते आणि त्यांच्याहून अधिक शिक्षित आणि सेवाजेष्ठतेत अधिक सक्षम अधिकारी पालिकेत कार्यरत होते. या अधिकार्यांधना येनकेन प्रकरणे टाळून श्री. केदार पाटील यांचेकडे वृक्ष अधिकार्यायचा पदभार सोपवणे हे कायद्याला आणि प्रशासकीय परंपरेला साजेसे नव्हते.
  • त्यामुळे सध्या वृक्ष प्राधिकारणात अशी परिस्थिति आहे की वरिष्ठ दर्ज्याचे अधिकारी एकतर दुसर्याप विभागात काम करताहेत किंवा शैक्षणिक आणि जेष्ठतेत कनिष्ठ दर्ज्याच्या केदार पाटील यांच्या हाताखाली काम करताहेत. याचा परिणाम शहरातील वृक्षांच्या संवर्धनावर होतो आहे कारण कारभार एका अयोग्य अधिकार्याखकडे एकवटलेला आहे. त्यामुळे श्री. केदार पाटील यांची या पदावरून तात्काळ गच्छंती होणे गरजेचे आहे.
  • याच बरोबर पालिकेच्या घनकचरा विभागातील कंत्राटदार असलेली जी अँड जी कन्स्ट्रकशन ही कंपनी तसेच पालिकेतील उद्यान विभागातील वृक्ष पुन:रोपण करणार्यास गुरुकृपा अग्रोटेक व कृपा अग्रो या कंत्राटदार कंपन्यांचे मालक कोण आहेत व त्यांचा केदार पाटील यांच्याशी काय संबंध आहे याचीही चौकशी होणे गरजेचे आहे कारण या कंपन्या वृक्ष पुन:रोपणाचे अत्यंत जोखमीचे व नाजुक काम करीत आहेत.

वरील सर्व बाबींचा विचार करता केदार पाटील हे एक अत्यंत वादग्रस्त अधिकारी शहरातील सर्व झाडे आणि पर्यायाने पर्यावरणाशी जोडले गेले आहेत. अशा एक अत्यंत वादग्रस्त आणि अकार्यक्षम अधिकार्यापला तात्काळ त्या पदावरून काढून शहरातील पर्यावरणाचा कारभार सुयोग्य अधिकार्याअच्या हाती सोपवावा ही विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *