महापालिका आयुक्तांची विनंती – ठाण्यातील झाडे वाचविण्याची जबाबदारी मतदाता जागरण अभियानाने घ्यावी, महापालिकेला सहकार्य करावे…आम्ही स्वीकारली हि जबाबदारी…

आयुक्तांना दिलेले निवेदन

अॅड किशोर पवार यांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे बाबत.

संदर्भ – आपल्याला दिलेले दि. २६-०७, २८-०७ चे पत्र व आयुक्तांना दिलेले दि. ३१-०७ चे पत्र

महोदय,

काही दिवसांपूर्वी पाचपाखडी येथील उदयनगर सोसायटी जवळील एक झाड कोसळून रस्त्यावरून जाणारे अॅड किशोर पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वरकरणी हा अपघात वाटत असला तरी तो अपघात नसून सदोष मनुष्यवधच आहे असे आमचे म्हणणे आहे. आवश्यक ते सर्व पुरावे आपणास दिलेले असून आपणाकडून या प्रकरणी काहीही कारवाई झालेली दिसत नाही. आपण या प्रकरणी अहवाल बनविला असल्यास त्याचा निष्कर्ष काय आहे, हे आपण आम्हास कळविलेला नसल्याने आम्ही आजतागायत अंधारात आहोत.

वृक्ष पडल्याच्या ५०० हून जास्त दुर्घटना शहरात घडल्या आहेत, त्यात जीवितहानी बरोबरच मालमत्ता व वाहनांचे नुकसान होतच आहे. कालच भक्ती मंदिर रस्त्यावरील झाड पडून शाळेची बस व रिक्षेचे नुकसान होऊन एक रिक्षाचालक जखमी झाला, जोपर्यंत या प्रशासनाचा भाग म्हणून ह्या घटनांची संवैधानिक जबाबदारी निश्चित करीत नाही तोपर्यंत अशा दुर्घटना थांबणार नाहीत, त्यासाठी एक सामाजिक व नैतिक जबाबदारी म्हणून आपण पालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचा पुनरुच्चार करीत आहोत.

दि. १७ ऑगस्ट रोजी आम्ही नागरी वृक्ष परिषद आयोजित केली होती, त्यात पर्यावरण कायद्याचे अभ्यासक, वृक्ष तज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते अशा सर्वांनी वृक्ष पडण्याच्या अनेक कारणांमध्ये “निगा न राखणे” व “कायद्याचे काटेकोर पालन न करणे’, हि या दुर्घटनांची महत्त्वाची कारणे आहेत असे म्हटले आहे. त्याला जोडूनच नियमांप्रमाणे शहरातील सर्व झाडांची जबाबदारी पालिकेची आहे. याचा सरळ अर्थ होतो कि कायद्याने दिलेली कर्तव्य न पाळल्याने अपघात झाला आहे, हा अपघात नैसर्गिक नसून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकल्याने झालेला अपघात आहे, हा मृत्यू हा अधिकाऱ्यांच्या चुकीने झाला आहे व अपघात नसून गुन्हाच आहे, यावर दुमत होणार नाही.

कालपर्यंत आम्ही काही सजग नागरिक हि मागणी करीत होते, आज सामान्य माणूस मोर्चाद्वारे आपल्याकडे हि मागणी करीत आहे, उद्या शहरातील त्रस्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतील इतक्या दुर्घटना घडत असताना आपण अधिक वेळ न दवडता ताबडतोब सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

आपण योग्य निर्णय घ्याल हि खात्री आहे अन्यथा हे आंदोलन आणखी मोठे होईल, याची नोंद घ्यावी हि विनंती

आपले,

ठाण्यातील त्रस्त नागरिक

मोर्चाच्या शेवटी शिष्टमंडळाला या प्रकरणी योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन ठाण्याचे पालिका आयुक्त श्री संजीव जैस्वाल यांनी दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *