पुन्हा एकदा भर पावसात आंदोलन …

पालिकेच्या गेटवर उभे राहून ठाणे मतदाता जागरण अभियानाचे आंदोलन

ठाण्यामध्ये पाच पाखाडी येथे झाड पडून किशोर पवार यांचा अकाली मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व वृक्ष अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने किशोर पवार यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाने केली होती. या मागणीचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत आणि तसा ठराव प्रशासनातर्फे महासभेत सादर करू असे आश्वासनही आयुक्तांनी दिले होते. मात्र मागच्या महासभेत अशा प्रकारचा ठराव प्रशासनाने सादर केला नाही त्यामुळे आज होणार्‍या महासभेत नगरसेवकांनी असा ठराव आणण्याचा प्रयत्न करावा प्रसंगी प्रशासनावर दबाव आणावा अशी विनंती करण्यासाठी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचा गेटवर निदर्शने केली.

या निदर्शनांचा वेळी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळात महापालिकेत जाणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाला थांबवून अशा प्रकारचा ठराव आपण आणावा अशी विनंती अभियानाच्या कार्यकर्त्यांनी केली. वृक्ष परिषदेत जनतेने पारित केलेला लोकांचा ठराव, वृक्ष अधिकारी केदार पाटील यांचा बेजबाबदार कारभार, वृक्ष कायदा-75 आणि वृक्ष प्राधिकरणाचे काम कसे असावे याच्या सूचना असे लेखी साहित्य निवेदनासोबत नगरसेवकांना देण्यात आले. महापालिकेत जाताना महापौर, गटनेते आणि सभागृह नेते यांच्यासह जवळपास 70 नगरसेवकांना हे निवेदन देण्यात आले.

विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी मात्र अशा प्रकारचा ठराव महासभेत मंजूर झाला असल्याची माहिती दिली आणि या ठरावावर आपण सहीदेखील केली आहे असे सांगितले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे असा ठराव मंजूर झाल्याची कोणतीही माहिती 80% नगरसेवकांना नव्हती. भर पावसात चाललेल्या या आंदोलनात अभियानाचे अध्यक्ष अनिल शाळीग्राम यांच्यासह सचिव उन्मेष बागवे, सहसचिव मंगेश खातू, खजिनदार गिरीश साळगावकर तसेच प्रा सुनिता कुलकर्णी, डॉ चेतना दीक्षित, सुनिती मोकाशी, सुब्रतो भट्टाचार्य आणि अनुप प्रजापति आदी कार्यकर्ते हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *