हेरिटेज वडाचा वृक्ष वाचवीण्यासाठी “वडपौर्णिमा” साजरी करा ! ठाणे मतदाता जागरण अभियान व म्युसचे नागरिकांना आवाहन

ठाण्यात दर एक तासाला एक झाड किंवा मोठा वृक्ष कापण्यात येतो आहे. ठाणे महापालिकेला व वृक्ष समितीला याबाबत कोणताही खेद वाटत नाही. विकासाकरिता हे करावेच लागेल असा उलटा पवित्रा या यंत्रणा घेत आहेत. मोठी वृक्ष लागवड केल्याचे दावे केले जात आहेत, पण ही लागवड कुठे केली? किती केली? त्यातील किती वृक्ष जगले? याची माहिती उपलब्ध नाही. जनतेचे पैसे मात्र खर्च झाले आहेत, होत आहेत.

विकास कामात झाडे कापावी वा पुनररोपित करायची आहेत असे सांगितले जाते, पण अशी झाडे व वृक्ष कोठून काढून कोठे लावली? लावलेली झाडे जगली का? याचा कोणताही तपशील नाही. मुळात तसा तपशील अजूनपर्यंत दिला गेलेला नाही.

कोलशेत येथे लोढा बिल्डरच्या गृह प्रकल्पात ३०० वर्षाचे हेरिटेज दर्जा असलेला प्रचंड वृक्ष आहे. हा वृक्ष ठाण्याची शान आहे. या वृक्षाभोवती काँक्रीटचे कंपाऊंड करून हा वृक्ष मारण्याचे काम सुरू असून हा वृक्ष वाचवणे हीच एकप्रकारे वट पौर्णिमा आहे असे आमचे मत आहे. प्रचंड उष्म्याने नागरिक हैराण आहेत. पाण्याची भीषण टंचाई राज्यात आहे. हवामानातील बदल जीवघेणे ठरायला लागले आहेत. निसर्गाचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात आहे. विकासाच्या नावाखाली हे सर्व होत आहे.

म्हणूनच एक एक झाड वाचवणे गरजेचे झाले आहे. याकरता उद्या रविवारी १६ जून रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या संख्येने कोलशेत येथे नागरिकांनी जमावे व वृक्ष बंधन करून वृक्ष वाचविण्याची शपथ घ्यावी असे आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियानाचे संजीव साने, डॉ.चेतना दिक्षीत, रोहित जोशी, अनिल शाळीग्राम तसेच म्युसचे निशांत बंगेरा यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *