ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या प्रयत्नाला यश – वडाळा ठाणे मेट्रो भूमिगत व्हावी यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानाची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याच्या पहिल्या टप्प्यात ठाण्यातील झाडे वाचविण्यासाठी न्यायालयाने अभियान व अन्य याचिकाकर्ते रोहित जोशी यांच्यासोबत विचारविमर्श करून काही ठोस निर्णय घेतले.

‘वडाळा – मुलुंड – ठाणे- कासारवडवली’ मेट्रो ४ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १०२१ वृक्षांची शास्त्रोक्त पुनर्रोपण प्रक्रियेवर ‘एमएमआरडीए’ आणि संबंधित कंपन्यांनी सुरू केली आहे. ठाणे नागरिक प्रतिष्ठान (ठाणे मतदाता जागरण अभियानाची रजि संस्था) आणि रोहित जोशी यांच्यावतीने तीन तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या समितीच्या निरीक्षणाखाली ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी समितीच्या सदस्यांनी तीन हातनाका ते माजिवडा परिसरातील झाडांची पाहणी केली आहे. संपूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने ही वृक्षारोपणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन एमएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

ठाणे मेट्रो चार प्रकल्पामुळे बाधित होणारे एक हजाराहून अधिक वृक्षांच्या पुनर्रोपण प्रक्रियेतील अशास्त्रीय पद्धतीमुळे वृक्षांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या वृक्षांसाठी ठाण्यातील पर्यावरणप्रेमींसोबत ठाणे मतदाता जागरण अभियानाने व्यापक जनआंदोलन सुरू केले असून न्यायालयीन लढाही सुरू केला होता. मेट्रो प्रकल्पबाधित वृक्षतोडीवर जैसे थेचे आदेश उठल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास वृक्ष तोडण्यास सुरुवात झाली होती. परंतु वृक्षप्राधिकरणाच्या मंजुरी बैठकीवरील जैसे थेच्या आदेशाने या प्रकल्पासही स्थगिती होती.

या प्रकरणी मेट्रो प्रकल्पबाधित वृक्षांच्या बचावासाठी नागरिक मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी पोहोचून झाडांची छाटणीही रोखली होती. त्यानंतर न्यायालयामध्ये या प्रकरणी झालेल्या सुनावणीत पुनर्रोपण प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करूनच स्थलांतर करण्याचे आदेश २० डिसेंबर रोजी देण्यात आले होते. त्यानुसार तीन जणांची तज्ज्ञ समिती याचिकाकत्यांच्यावतीने नियुक्त करण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. नागेश टेकाळे, सीमा हर्डीकर आणि मानसी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या समितीच्या उपस्थितीमध्ये एमएमआरडीएच्या कंत्राटदारांनी शुक्रवारी वृक्षपुनर्रोपण प्रक्रियेची माहिती दिली. त्याची इत्यंभूत माहिती समितीने घेतली असून त्यावर काही सूचनाही संबंधित यंत्रणांना दिल्या.समितीने होत असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. परंतु त्याचवेळी स्थलांतरित होत असलेले ठिकाण ठाणे महापालिकेच्या हद्दीत असावे, खड्डा खोदल्यानंतर त्या ठिकाणीही संप्रेरकांची प्रक्रिया करण्याचे आणि केवळ ५० टक्के वृक्षांच्या फांद्याची छाटणी करण्याचे निर्देश समितीने दिले आहेत. पुढील टप्प्यात वृक्षारोपण होत असलेल्या झाडांच्या जागेचीही पाहणी करण्यात येणार असल्याचे समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *